जळगाव : गंभीर गुन्ह्यात कारागृहात दाखल असलेल्या बंद्याने खिडकीचा काचा आणि लोखंडी जाळी तोडली. तसेच अधिक्षक यांना अर्वाच्च भाषेचा वापर करून शिवीगाळ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी लखन उर्फ गोलू दिलीप मराठे हा न्यायालयाच्या आदेशानुसार ३ ऑगस्टपासून जळगाव कारागृहात आहे. न्यायदंडाधिकारी जळगाव यांनी १३ रोजी आदेशानुसार त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्याच्या सुचना दिली होत्या. त्यानुसार जळगाव मुख्यालयातील पथक मंगळवार १७ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव कारागृहात लखन उर्फ गोलू याला घेण्यासाठी दाखल झाले.
दरम्यान, आपली नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे बंदी लखन उर्फ गोलू याचा समजले. त्यानंतर नातेवाईकांच्या मुलाखतीनंतर सर्कल २ मधून बॅरेक क्रमांक ७ मध्ये मुलाखत कक्षाजवळ असलेल्या कारागृह अधिक्षक कार्यालयाच्या मागील बाजूस खिडकीची लोखंडी जाळी हाताने काढली व काच हाताने तोडून तरूंग अधिक्षक ए.आर. वांडेकर यांची आर्वच्च भाषेत बोलून माझी जेलची बदली पोलीसांनीच केली असे म्हणून शिवीगाळ केली. याप्रकरणी वरीष्ठ तुरूंग अधिकारी गजानन विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.