ज्यादा भावाने व बोगस बियाणे विक्री; व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा

जामनेर : तालुक्यातील कृषी केंद्र व्यापारी चढ्या भावाने बियाण्यांची व खतांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे काही शेतकऱ्यांनी केल्या. या तक्रारीची दखल घेत भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर येथे गुरुवारी व्यापारी, कृषीअधिकारी व भाजपा पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी जो व्यापारी बियाणांची चढ्या भावाने विक्री करेल व बोगस बियाणे विकेल अशा व्यापाऱ्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील ,असा इशारा दिला.

या बैठकीत माजी प.स. सभापती नवल पाटील यांनी सूचना केली की संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येक दुकानावर जाऊन दररोजचा स्टॉक व विक्री याची नोंद ठेवून तसा अहवाल द्यावा. जे व्यापारी जादा भावाने व बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची लूट करत असतील अशा व्यापाऱ्यांच्या तक्रारी भाजपा पदाधिकाऱ्यांकडे कराव्यात त्याची दखल घेतली जाईल असे मार्गदर्शन तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले. या बैठकीस तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी ढेपले, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर ,आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील , भाजपा तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजमल भागवत जिल्हा पदाधिकारी तुकाराम निकम ,शहर पदाधिकारी कैलास पालवे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी अभय बोहरा प्रदीप लोढा यांचे सर्व व्यापारी उपस्थित होते.