झाड तोडू देत नाही, कुऱ्हाडीने केला आईचा खून; घटनेनं नंदुरबार जिल्हा हादरला

नंदुरबार : शेतातील वडिलोपार्जित झाड तोडून त्याची विक्री करण्यास मनाई करणाऱ्या आईचा मुलाने खून केला. ही धक्कादायक घटना कालीबेल, ता. धडगाव येथे गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शुक्रवारी उशिरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पिसीबाई सोमल्या वळवी (७२) असे मयत मातेचे नाव आहे.

पिसीबाई यांचा लहान मुलगा अनिल सोमल्या वळवी (३२) हा शेतातील आंब्याचे झाड तोडून त्याची विक्री करण्याचा हट्ट सातत्याने करत होता. यातून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी अनिल हा आई पिसीबाई यांच्याकडे आला होता.

त्याने पुन्हा झाड तोडण्याचा हट्ट केला. परंतु ते झाड वडिलोपार्जित असल्याने त्याची तोड करू नये, असे सांगून त्याला समज देण्याचा प्रयत्न झाला. परंतु, काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या अनिल सोमल्या वळवी (३२) याने हातातील कुऱ्हाडीने आई पिसीबाई यांच्यावर वार केले.

यात हात आणि डोक्यावर जबर मार बसल्याने पिसीबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दौलत सोमल्या वळवी यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनिल वळवी (३२) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.