टिल्ल्या म्हणताच नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार, म्हणाले…

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्यांच्याविषयी पत्रकार परिषदेत विचारणा झाल्यानंतर अजित पवार यांनी नितेश राणे यांच्यावर अत्यंत बोचर्‍या शब्दांत वार केला. टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझ्या पक्षाचे बाकीचे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. मी असल्यांच्या नादी लागत नसतो, असे अजित पवार यांनी म्हटले. यामुळे खवळलेल्या नितेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार पलटवार केला आहे.

नितेश राणे यांनीही ट्विट करून अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टीका सहन होत नाही, म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वीही नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. होय आम्ही, हिंदवी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार. मी ही गोष्ट धरणवीर अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगत आहे. धरणवीरांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता.

अजित पवार काय म्हणाले?

छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात मी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. स्वराज्यरक्षक ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक आणि महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला शोभणारी आहे. त्यामुळे स्वराज्यक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. नागपूरातील अधिवेशनात सभागृहात माझ्या त्या भूमिकेवर कोणत्याही आमदाराने विरोध केला नाही. पण दोन दिवसांनंतर माझ्या वक्तव्याबाबत भाजपचे आंदोलन सुरु झाले. कारण भाजपच्या मंडळींचा सूत्रधार त्यादिवशी सभागृहात नव्हता, असा टोला अजित पवारांनी लगावला होता.