भारतीय संघ यंदाही खूप व्यस्त असणार आहे, ज्यामध्ये 2024 च्या टी-20 विश्वचषकात विजेतेपद मिळवण्याचे सर्वात मोठे लक्ष्य असेल. या विश्वचषकाची तयारी म्हणून टीम इंडियाकडे फक्त एकच टी-२० मालिका आहे आणि त्याआधीही निवडीबाबत मोठे प्रश्न कायम आहेत.
गेलं वर्ष टीम इंडियासाठी गोड आठवणींनी भरलेलं होतं. भारतीय संघाने प्रत्येक फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केली पण गेल्या 10 वर्षांप्रमाणे पुन्हा एकदा कोणतेही मोठे जेतेपद पटकावता आले नाही. आता नवीन वर्षातही त्याला संधी आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याची आशा भारतीय संघाला असेल, पण त्याआधी कोणत्या खेळाडूंना संघात संधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
याची झलक अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पाहायला मिळेल, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपली जुनी चूक पुन्हा करणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.