जळगाव : ट्रक खाली झोपलेल्या क्लिनरचा चिरडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवार, १८ रोजी दुपारी २ वा. एमआयडीसीमध्ये घडली. दीपक विनोद मेढे (३८, रा. फैजपूर, ता. यावल) असे मयत क्लिनरचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
जळगाव शहरातील एमआयडीसीमधील एका कंपनीसमोर ट्रक उभा होता. ट्रकच्या खाली ट्रकचे क्लिनर दीपक मेढे झोपलेले होते. ही बाब चालकाच्या लक्षात न आल्याने ट्रक सुरू करून जागेवरून बाहेर काढला. चाकाखाली कोणीतरी आल्याचे चालकाच्या लक्षात आले. येऊन पाहिले असता त्याच्या ट्रकवरील क्लिनरच चिरडल्या गेल्याचे दिसले.
यात क्लिनच्या चेहऱ्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून हात-पायदेखील तुटले. ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. काही वेळातच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनमा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मयताच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे.