ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी करणार राजकारणात एन्ट्री ; जळगावातून निवडणूक लढवण्याची इच्छा

जळगाव । आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण राजकारणाचा आखाडा गाजवण्याच्या तयारीत असल्याचे खुद्द विजय चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

विजय चौधरी यांना राजकारणात कोणत्या पक्षाकडून ऑफर आली आहे का? यावर बोलताना सांगितले की, अद्याप कुठल्याच पक्षाची आपणास ऑफर नाही. मात्र भारतीय जनता पक्ष (BJP) आपला आवडता पक्ष आहे. त्या पक्षाकडून संधी मिळाल्यास आपण लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे, असे ते म्हणाले

विजय चौधरी यांचं चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे गाव आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात जर संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जळगाव लोकसभेत सध्या भाजपचे उन्मेष पाटील खासदार आहेत. भाजप उन्मेष पाटील यांना पर्याय शोधत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. आता यातच विजय चौधरी यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.

विजय चौधरी यांची २०१७ मध्ये राज्य सरकारकडून पोलीस उपअधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते पुणे पोलीस दलात कार्यरत आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी कुस्तीच्या आखाड्यानंतर आता राजकारणाचा आखाड्यात उतरत आहे.