नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते साक्रीच्या दरम्यान तिळासर शिवारात २० लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा वाहून नेणारे अवजड वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरून अवैध मद्याचा साठा वाहून नेण्यात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने महामार्गावर विसरवाडी ते साक्रीच्या दरम्यान तपासणी सुरू केली होती. या तपासणीच्या दरम्यान तिळासर शिवारात एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकवर पथकाला संशय आला होता. यातून पथकाने एमएच १४ सीपी ४०२८ वरील ट्रक चालक आणि साथीदार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनीही पळ काढला होता.
पथकांनी वाहनांची झडती घेत तपासणी केली असता, आतमध्ये दिव-दमण येथून आणलेला २० लाख १० हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. एकूण १५० मोठमोठ्या खोक्यांमध्ये व्हिस्की, बीयर आदी प्रकारांत हा मद्यसाठा होता. राज्य उत्पादक शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच.तडवी, तसेच नंदुरबार येथील अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक डी.एम. चकोर, निरीक्षकबी.एस. महाडिक, दुय्यम निरीक्षक पी.जी. मेहता, सहायक दुय्यम निरीक्षक मोहन पवार, जवान हंसराज चौधरी, भूषण चौधरी, अजय रायते, चालक मानसिंग पाडवी यांनी केली.
या कारवाईला विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू कोकणी, पोलिस नाईक अनिल राठोड, पोलिस शिपाई लिनेश पाडवी यांनी साहाय्य केले. गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत पाटील करत आहेत.