यावल : ट्रॅक्टर धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे उपचारादरम्यान निधन झाल्यानंतर दोषी चालकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी मृतदेहच पोलीस ठाण्यात आणला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी शांततेने नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेत दोषीवर कठोर कारवाईसह गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हलवला.
11 दिवसांच्या उपचारानंतर जखमीचे निधन
10 जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजता विरावली गावाजवळ संशयीत आरोपी तथा ट्रॅक्टर चालक खलील रफिक तडवी (कोरपावली, ता.यावल) याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अरुण किशोर भालेराव या तरुणाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. जखमीवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू ओढवला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी शनिवारी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल होऊन कारवाईच्या मागणीसाठी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्यासह कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर युवकावर कोरपावली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात. सत्यवान युवराज भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कॉन्स्टेबल किशोर परदेशी करीत आहे.