मुंबई : उद्धव ठाकरेंनी नक्षलवाद्यांच्या हाताने एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता, असा धक्कादायक खुलासा आज शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी केला. संजय गायकवाड यांच्या दाव्याला तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा नाकारली, असा दावा तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
उबाठा गटाकडून संजय गायकवाड आणि शंभूराज देसाई यांच्या दाव्यांवर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. तरीही सोशल मिडियावर याबाबत चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर झेडप्लस, झेड, वायप्लस या सुरक्षा श्रेणींची सुद्धा तितकीच चर्चा सोशल मिडियावर चालू आहे. त्यामुळेच आजच्या या लेखात आपण भारतात देण्यात येणाऱ्या सर्वच सुरक्षा श्रेणीची माहिती घेणार आहोत.
सुरक्षा कोणाला दिली जाते? भारतामध्ये कोणत्या सुरक्षा श्रेणी आहेत? सविस्तर वाचा
कोणत्याही नागरिकाच्या जीवाला धोका असल्यास सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते. सुरक्षा एजन्सी एखाद्या व्यक्तीच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्या आधारावर एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरवते. भारतात साधारणपणे पाच प्रकारची VVIP सुरक्षा पुरवली जाते. यामध्ये झेडप्लस, झेड, वायप्लस, वाय आणि एक्स या सुरक्षा श्रेणींचा समावेश होतो.
१) झेडप्लस सुरक्षा
झेडप्लस सुरक्षा ही भारतातील सुरक्षिततेची सर्वोच्च श्रेणी मानली जाते. झेडप्लस सुरक्षेत, १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडो आणि पोलिस कर्मचार्यांसह ५५ प्रशिक्षित कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेत तैनात असतात. सुरक्षेमध्ये गुंतलेला प्रत्येक कमांडो मार्शल आर्टमध्ये तज्ञ असतो. यासोबतच या गटाकडे आधुनिक शस्त्रेही असतात. भारतात झेडप्लस सुरक्षाही गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्यात आलेली आहे.
२) झेड सुरक्षा
झेडप्लस नंतर, झेड श्रेणीतील सुरक्षा ही सर्वात सुरक्षित मानली जाते. झेड श्रेणीतील सुरक्षेमध्ये ६ एनएसजी कमांडोसह २२ सैनिक आणि पोलिस कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेत तैनात असतात. ही सुरक्षा दिल्ली पोलिस, आयटीबीपी किंवा सीआरपीएफचे जवान पुरवतात. केंद्रीय मंत्र्यांसोबतच देशातील काही महत्वपूर्ण व्यक्तीना ही सुरक्षा दिली जाते.
३) वायप्लस सुरक्षा
झेड सुरक्षेनंतर वायप्लस सुरक्षेचा क्रमांक येतो. या सुरक्षा श्रेणीमध्ये ११ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. या सुरक्षा श्रेणीत २ कमांडो आणि २ पीएसओ असतात. यासोबतच पोलिसही या ग्रुपमध्ये सामील असतात. काहीदिवसांपूर्वीच वायप्लस श्रेणीची सुरक्षा अभिनेता शाहरुख खान यांना देण्यात आली. शाहरुख खानसोबतच या श्रेणीची सुरक्षा कंगना राणावत आणि जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना सुद्धा देण्यात आलेली आहे.
४) वाय सुरक्षा
वाय श्रेणीच्या सुरक्षेत १ किंवा २ कमांडोसह ८ सैनिकांचा समावेश असतो. भारतात सर्वाधिक लोकांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आलेली आहे. वाय श्रेणीची सुरक्षा राज्य सरकारमधील मंत्र्यांना आणि काही महत्वपूर्ण सरकारी अधिकाऱ्यांना दिली जाते.
५) एक्स सुरक्षा
एक्स श्रेणीच्या सुरक्षेत संबंधित व्यक्तीसोबत २ सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात असतात. ही सुरक्षा वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याद्वारे प्रदान केली जाते. काही कारणास्तव सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवाला धोका असल्यास एक्स श्रेणीची सुरक्षा दिली जाते.
भारतात कोणत्याही व्हीव्हीआयपी व्यक्तीला सुरक्षा देण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांच्या अहवालावरुन सुरक्षा पुरवली जाते. यामध्ये SPG, NSG, ITBP आणि CRPF सारख्या एजन्सींचा समावेश आहे. ही सुरक्षा मिळवण्यासाठी सरकारकडे अर्ज द्यावा लागतो, त्यानंतर गुप्तचर यंत्रणा त्या व्यक्तीला किती धोका आहे, याचा अहवाल तयार करतात. हा अहवाल गृहसचिव आणि महासंचालक आणि मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवण्यात येतो. यावर अंतिम निर्यण हीच समिती घेते.
सुरक्षा यंत्रणा काही व्यक्तींकडून पैसे घेऊन सुद्धा त्यांना सुरक्षा पुरवतात. काही रिपोर्टनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी आणि सिनेअभिनेता शाहरुख खान हे आपल्या सुरक्षेच्या बदल्यात तपास यंत्रणांना पैसे देतात. एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, शाहरुख खान हे वायप्लस श्रेणीच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना महिन्याला १६ लाख रुपये देतात.