ठाकरेंच्या जागावाटपाच्या वक्तव्यानंतर नाना-उध्दव भेट; काय आहे आतली बातमी?

मुंबई : येत्या काळात जागावाटपावरुन मविआमध्येही जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. अशातच महाविकास आघाडीत असलेला ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर आग्रही असल्याची माहिती मिळाली होती. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा असून त्या सहा जागांसाठी महाविकास आघाडीचा 4-1-1 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठक मातोश्रीवर उद्धव ठाकरे घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतील दक्षिण मुंबई दक्षिण, मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभांच्या जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती होती.
यामध्ये दक्षिण मुंबईसाठी विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. तर ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाची चाचपणी सुरू असून या दोन जागांसाठीचा उमेदवार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही.