ठाकरे गटाला शिंदेंचा आणखी एक धक्का; आता काय घडलं?

मुंबई : चांदीवली विभागाचे माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला. त्यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटासाठी हा आणखी एक धक्का समजला जात आहे.
लीना शुक्ला यावेळी म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या कामाच्या वेगामुळेच मुंबईत सध्या अनेक बदल घडत आहेत. त्यामुळे त्यांनी कायम मुख्यमंत्रीपदावर कायम रहावे.” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मुंबईत झालेली विकासकामे मुंबईमध्ये झालेला बदल आज लोकांच्या डोळ्यासमोर आहे. आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात सारी कामे ठप्प झाल्यासारखी परिस्थिती होती. कोरोना होता पण तो गेल्यावर देखील ज्या पद्धतीने विकास प्रकल्पाना चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही. वैयक्तिक अहंकारापोटी हे सगळे विकासप्रकल्प थांबवले गेले होते. खरं तर वैयक्तिक स्वार्थ दूर सारत राज्याचा विकास करणे ही प्रत्येक मुख्यमंत्र्याची जबाबदारी असते.” असं शिंदे म्हणाले.