ठाणे : पहाटेच्या समयी मंगलमय वातावरणात रविवारी ठाण्यात झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांसाठी तरुणाईचा जनसागर उसळला. गडकरी रंगायतन चौकात ठाकरे गटाची, तर तलावपाळी येथील जांभळी नाका, रंगो बापुजी चौकात माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि तलावपाळी नौकाविहार नजीक शिंदे गटाच्या दोन दिवाळी पहाटचे आयोजन केले होते. यंदा जांभळी नाक्यावर नृत्यांगना गौतमी पाटील हिची अदाकारी पाहण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने उपस्थित राहुन तरुणाईशी संवाद साधला. तर,आ.निरंजन डावखरे, आ. संजय केळकर आणि मा.खा.संजीव नाईक यांनीही प्रतीवर्षीच्या परंपरेप्रमाणे ठाण्यातील विविध दिवाळी पहाटच्या कार्यकमांना उपस्थित राहुन नागरीकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
ठाण्यात दरवर्षी दिवाळी पहाट राममारुती रोड आणि तलावपाळी येथे रंगत असते. जांभळी नाक्यावर माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील यांची अदाकारी पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. संपूर्ण परिसर गर्दीने फुलुन गेला होता. गौतमी पाटीलने तरुणाईला साद घालुन भूरळ घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गौतमी पाटीलचा सत्कार केला. शिंदे गटाकडुन तलावपाळी परिसरात आणखी एका दिवाळी पहाटचे आयोजन केले होते. तर उद्धव सेनेचे खा. राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टची दिवाळी पहाट गडकरी रंगायतन चौकात होती.
राममारुती रोड येथे भाजपने दिवाळी पहाट आयोजित केली होती. तरुणाईची गर्दी खेचण्यासाठी सर्वच आयोजकांनी डीजे लावल्याने संगीताच्या उच्चरवात पारंपारिक वेषात आलेल्या तरुणाईने एकच जल्लोष केला. पु.ना. गाडगीळ येथे भाजप, न्यू इंग्लिश स्कूल येथे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी ब्रास ब्रँड, नजीकच्या चौकात स्वामी प्रतिष्ठान आणि किरण नाकती फाउंडेशन, कोपरी येथील अष्टविनायक चौकात,भाजपचे राजेश जाधव यांच्या ब्रम्हांड कट्टा घोडबंदर रोड आणि वृंदावन सोसायटीत ही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाना मोठी गर्दी उसळली होती. संपूर्ण शहरभर तरुणाई पारंपारिक वेषात रस्त्यावर उतरल्याने चहुबाजुने वाहतुक कोंडी झाली होती. या जल्लोषी वातावरणामुळे पोलिसांनी अनेक महत्वाच्या मार्गावर वाहतुक बदल केले होते.
ब्रम्हांड कट्यावर सुरमयी पहाट
घोडबंदर रोडवरील ब्रह्माण्ड कट्टा सामाजिक-सांस्कृति मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी आमदार संजय केळकर,आ. निरंजन डावखरे,मा. गटनेते मनोहर डुंबरे, परिवहन सदस्य विकास पाटील, ब्रम्हांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव, अध्यक्ष महेश जोशी आदींची उपस्थिती होती.
देशभक्तीपर गीतांनी गुंजली पहाट
भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्यावतीने राम मारूती रोडवरील टीजेएसबी बॅंकेच्यासमोर बाळकुम येथील ब्रास बॅण्डवर नागरिकांना जुन्या-नव्या हिंदी-मराठी गीतांबरोबरच देशभक्तीपर गीतांची धून ऐकावयास मिळाली.