चाळीसगाव : डाऊन एलटीटी-गोरखपूर कृषीनगर एक्स्प्रेसमधील एका जनरल बोगीत प्रवाशाच्या बॅगेतील स्फोटक पदार्थाने पेट घेतल्याने सर्वसाधारण बोगीतील प्रवाशांमध्ये प्रचंड धावपळ उडाली. ही धक्कादायक घटना शनिवार, 18 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास नांदगाव-चाळीसगाव दरम्यान घडली. या घटनेनंतर सतर्क प्रवाशाने पायाने बॅगेला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने प्रवासी भाजला गेला तर चाळीसगावात गाडी आल्यानंतर आग लागण्यास कारणीभूत ठरलेला संशयीत प्रवासी पसार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान, या गंभीर घटनेची दखल औरंगाबाद प्रभारी पोलीस अधीक्षक गणेश शिंदे घेत शनिवारी सायंकाळी चाळीसगावात जावून माहिती जाणून घेतली तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित प्रवाशाचा शोध सुरू करण्यात आला आहे. या सर्व प्रकारात गाडीला तासभर विलंब झाल्याने सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केल्यानंतर गाडी भुसावळकडे मार्गस्थ झाली.
स्फोटक पदार्थामुळे बर्थला लागली आग
सूत्रांच्या माहितीनुसार, एलटीटी स्थानकावरून निघालेल्या कृषी नगरच्या इंजिनापासून तिसर्या क्रमांकावरील बोगीत सामान ठेवण्याच्या जागी असलेल्या बर्थवरील एका बॅगेला नांदगाव-चाळीसगाव दरम्यान शनिवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास आग लागल्यानंतर प्रवाशांनी बर्थ जळत असल्याचे पाहून बॅगेला खाली फेकले व ही बॅग अजय अशोक मगरे (23) या युवकाच्या बाजुला पडल्याने त्याने पायाने आग विझविण्याच्या प्रयत्न केला मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने या युवकाचा पाय भाजला गेला. एव्हाना गाडीला आग-आग म्हणत प्रवाशांनी प्रचंड आरडा-ओरड सुरू केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले तर चाळीसगाव स्थानकाजवळ चैन पुलिंग करून गाडी थांबवण्यात आली व रेल्वे सुरक्षा यंत्रणांना याची माहिती कळवल्यानंतर यंत्रणेने घडलेला प्रकार जाणून घेतला तर याचवेळी प्रवाशांच्या गर्दीतून आग लागल्यास कारणीभूत ठरलेला संशयीत प्रवासी निसटण्यात यशस्वी झाला तर तासाभराच्या विलंबाने गार्डी भुसावळकडे रवाना झाली. अजय मगरे या प्रवाशाच्या पायाला ईजा झाल्याने त्यास पाचोरा येथे उतरवण्यात आल्यानंतर उपचार करण्यात आले व त्याच्या फिर्यादीवरून अज्ञात प्रवाशाविरोधात चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फॉरेन्सिक टीमकडून तपासणी
रेल्वे प्रवाशात संशयित प्रवाशाच्या बॅगमुळे बर्थला आग लागल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या घटनेची दखल घेत फॉरेन्सिक टीमला पाचारण करीत बॅगेत नेमके काय स्फोटक रसायन होते? याचा शोध सुरू केला आहे. चाळीसगावचे सहाय्यक निरीक्षक किसन राख यांनी तसेच चाळीसगाव विभागाचे अपर अधीक्षक पाचोरा रमेश चोपडे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन अजय मगरे याची चौकशी करीत नेमका घडलेला प्रकार जाणून घेतला. दरम्यान, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेने पुन्हा अधोरेखीत झाला असून सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्याने अप्रिय घटना टळली असलीतरी भविष्यात या घटना टळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना अधिक सजग रहावे लागणार आहे.