डाकीया डाक लाया, खुशीयों का पैगाम कहीं, कही दर्द नाम लाया…!

रवींद्र मोराणकर

जळगाव :  ‘डाकीया डाक लाया, खुशीयों का पैगाम कहीं, कही दर्द नाम लाया…’ हे 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पलको की छॉंव में’ या चित्रपटातील राजेश खन्नावर चित्रीत झालेले गीत आज जुने झाले असले तरी टपालाच्या निमित्ताने या गीताची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. दरम्यान, खासगी कुरियर संस्था मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्या तरी टपाल खात्याची विश्वासार्हता आजही कायम आहे. सोशल मीडियाचा वापर वाढून टपाल काहीसे कमी झाले असले तरी टपाल खात्याच्या इतर सेवा वाढल्याने पूर्वीप्रमाणेच टपालाचे प्रमाण आजही कायम आहे.

दररोजचे टपाल सात-आठ हजारांपर्यंत

9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध बाबी प्रकर्षाने समोर येतात. मोबाईलसह सोशल मीडियाचे प्रमाण पूर्वी फारसे नव्हते. नंतर विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि माणसं पोस्टकार्ड लिहिणं विसरली. यात पोस्टकार्डाचे प्रमाण टपालात नगण्य असते. असे असले तरी आजच्या स्थितीत जळगाव शहरातील मुख्य टपाल कार्यालयात दररोज सुमारे सात ते आठ हजारांपर्यंत टपाल असते. यात स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड टपाल, साधे टपाल आदींचे प्रमाण अधिक असते. मोबाईलचा प्रसार वाढण्यापूर्वी दररोजचे टपालाचे प्रमाण सुमारे 10 ते 12 हजारांपर्यंत असायचे.

42 टक्के पदे रिक्तच

हेड पोस्ट ऑफिसमध्ये एकूण 126 पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात 74 कार्यरत असून 52 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये लिपिक, पर्यवेक्षक आदी पदांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही पदे रिक्त आहेत. आजच्या स्थितीत 42 टक्के रिक्त असलेल्या पदांमुळे कार्यरत सहकार्‍यांवर कामाचा ताण वाढतो. एकाला दोन ते तीन जणांचे काम करावे लागते, अशी स्थिती आहे.

कायदेशीर बाबींसाठी धरले जाते ग्राह्य

टपाल कार्यालयात सद्य स्थितीत आधारकार्ड नोंदणी, आधारकार्ड अपडेट करणे, ई-पोस्ट सर्व्हिस, इंडिया पोस्ट बँक, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण डाक जीवन विमा अशा काही सेवा वाढल्या आहेत. यामुळे काही टपाल कमी झाले असले तरी आता वाढीव सेवांमुळे पूर्वीप्रमाणेच काम आहे. खासगी कुरियर सेवा आज मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्या तरी मात्र शासकीय टपाल खाते आजही विश्वासार्हता टिकवून आहे. काही बाबींमध्ये कायदेशीर अडचणी उद्भवल्यास टपाल मिळाले की नाही, याबाबत टपाल कार्यालय यासाठी ग्राह्य आणि विश्वासार्ह समजले जाते, असे डाक अधीक्षक भोजराज चव्हाण, उपअधीक्षक शीतल म्हस्के, पोस्टमास्तर श्रीनिवास कुलकर्णी यांनी सांगितले.