‘डेक्कन ओडिसी ट्रेन-२.०’मुळे पर्यटनात होणार वाढ

मुंबई : ‘डेक्कन ओडिसी ट्रेन-२.०’ या आलिशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, देशातील प्रसिद्ध असणाऱ्या रेल्वेपैकी एक असलेली ही ट्रेन सुरु झाल्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासासाठी चालना मिळणार आहे. परदेशी पर्यटकांमध्ये अत्यंत गाजलेली व पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती डेक्कन ओडिसी ट्रेन आता नव्या रूपात धावणार आहे. ही आपल्यासाठी अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे. पर्यटकांनी या ट्रेनच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या ट्रेनला पर्यटन मंत्री महाजन आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्यानंतर पर्यटन मंत्री महाजन बोलत होते. ट्रेनला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे व पनवेल ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावली.

यावेळी पर्यटन व सांकृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्यासह भारतीय रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

या नव्या ट्रेनमधील सोयीसुविधा
मंत्री महाजन म्हणाले की, या ट्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा आणि सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. डेक्कन ओडिसी (Ultra Luxury Train) ही राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वात आलिशान ट्रेन आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ट्रेनच्या माध्यमातून पंचतारांकित हॉटेलचा अनुभव घेता येतो. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना राज्यातील पर्यटन स्थळे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. जुन्या ट्रेनमध्ये आता विविध बदल केलेले असून या ट्रेनमध्ये एकूण २१ डबे आहेत. ४० डिलक्स सूट आणि दोन प्रेसिडेंशल सूट आहेत. तसेच १ कॉन्फरन्स हॉल आहे. याशिवाय हेल्थ स्पा, जनरेटर व्हॅन, जिम, केबल टीव्ही, इंटरनेट, ग्रंथालय, म्युझिक प्लेअर अशा सोयीसुविधा आहेत.
महाराष्ट्राला पर्यटन नकाशावर वेगळी ओळख करून देणारी ट्रेन
डेक्कन ओडिसी या प्रकल्पास केंद्र शासन व राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर आता पर्यटन क्षेत्र पूर्व पदावर आले असून त्यामुळे आता डेक्कन ओडिसीची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटन महामंडळ सज्ज झाले असून नियुक्त केलेल्या ऑपरेटरद्वारे २१ सप्टेंबर २०२३ पासून डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयी सुविधेने पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरु होत आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातील अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.