डॉमिनिका देशाने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून मानले भारताचे आभार, काय आहे कारण?

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात जेव्हा जगातील प्रगत देश आपापल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होते, तेव्हा भारत सरकारने विकसनशील आणि गरीब देशांना कोरोनाची लस दिली होती. भारताच्या या कृतीचे अनेक देशांनी आभार मानले. त्यातच आता डॉमिनिका देशाने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून भारताचे आभार मानले आहेत.
संयुक्त राष्ट्र महासभेचे आयोजन न्यूयॉर्क, अमेरिकेत होत असून या कार्यक्रमात जगातील प्रमुख नेते सहभागी होत आहेत. डॉमिनिकाचे परराष्ट्र मंत्री डॉ. विन्स हेंडरसन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून भारताचे कौतुक केले. डॉ. विन्स हेंडरसन म्हणाले की, “कोरोना महामारीदरम्यान आम्ही शिकलेल्या धड्यांमुळे मला खूप प्रेरणा मिळाली.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “या महत्त्वाच्या व्यासपीठावरून मला हे सांगायचे आहे की मला आठवते की कोरोना महामारीच्या काळात आपण कोरोनाची लस कशी मिळवू शकतो आणि आपल्या लोकांना कसे वाचवू शकतो याचा विचार करत होतो. विशेषत: आमच्यासारख्या छोट्या देशात, जो पर्यटनावर अवलंबून आहे, आम्हाला लोकांचे संरक्षण करणे आवश्यक होते. आम्ही याचा विचार करत असतानाच भारताने आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि आम्हाला लस दिली.”
डॉमिनिकाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, ‘जेव्हा आम्हाला लस मिळाल्या, तेव्हा आम्ही त्या इतर कॅरिबियन देशांना उपलब्ध करून दिल्या. म्हणूनच, या महत्त्वाच्या व्यासपीठावरून आणि विशेषत: वैयक्तिकरित्या, आम्हाला गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी पुढे आल्याबद्दल भारतातील लोक आणि तेथील सरकारचे मनापासून आभार मानायचे आहेत.”