डॉ. हिना गावितांना मत म्हणजेच मोदींना मत; शिरपूरातून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

शिरपूर : ही निवडणूक गल्लीची नव्हे दिल्लीची आहे. गरिबांचे कल्याण करण्याबरोबरच राष्ट्र सुरक्षेचे धोरण राबवणारे नरेंद्रजी मोदी यांच्या हाती आपल्याला पुन्हा सत्ता द्यायची आहे. म्हणून महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना मत म्हणजेच मोदीजींना मत, हे लक्षात घेऊनच मतदान करा; असे जाहीर आवाहन महाराष्ट्रातील भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर येथील जाहीर सभेत केले. त्याचबरोबर राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांची जाण असलेल्या डॉ. हिना गावित यांच्यासारख्या युवा नेत्याला मोदी सरकारकडून सातत्याने प्राधान्य देत पुन्हा संधी देण्यात आली आहे; या शब्दात डॉ. हिना गावित यांच्या कार्यपद्धतीचा गौरव देखील केला.

शिरपूरचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अमरीश भाई पटेल, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, तळोदा शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, लोकसभा प्रभारी तुषार रंधे, भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शिवाजीराव दहिते, भूपेश भाई पटेल, शहाद्याचे दीपक बापू पाटील, नवापूरचे भरत गावित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवणारे नेते आहेत. गरिबांचा कोणी नेता असेल तर एकमेव नरेंद्र मोदी आहेत. आजपर्यंत देशात आदिवासी व्यक्ती उच्च पदावर पोहोचली नव्हती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्या हाती राष्ट्रपती पदाची सूत्रे असल्याचे आज आपण पाहत आहोत. कोणीही आदिवासी बेघर राहू नये यासाठी त्यांनी घरकुल योजना राबवल्या त्याचप्रमाणे आर्थिक मजबुती देणाऱ्या विविध योजना आणल्या. लवकरच महसुलीप्रमाणे वनपट्ट्यांनाही दर्जा दिला जाणार आहे, असे प्रमुख भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आणि महायुतीचे उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या कार्यपद्धतीचा गौरव करताना त्यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषनावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्याची संधी आजपर्यंत भाजपातून कोणाही युवा नेत्याला मिळाली नव्हती ती संधी डॉ. हिना गावित यांना मिळाली.

सलग दोन निवडणुकांमध्ये बहुमत देऊन शिरपूर तालुक्याने मला संधी दिली म्हणून मी त्यांचे खूप आभार मानते अशा शब्दात याप्रसंगी केलेल्या भाषणात महायुतीचे उमेदवार डॉ. हिना गावित यांनी शिरपूरवासीयांचे जाहीर आभार मानले. देशाला विकास मार्गावर नेणारे नरेंद्र मोदी एकमेव पावरफुल नेते आहेत, असे नमूद करताना त्यांनी पुढे सांगितले, शिरपूर प्रमाणे संपूर्ण नंदुरबार लोकसभा मतदारसंघात जल नियोजन करता यावे म्हणून एकवीफर मॅपिंग केले जाईल त्यासाठी रोड मॅप तयार केला आहे. शिरपूर मध्ये सगळे आले परंतु रेल्वे आले नाही म्हणून मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला पुढील पाच वर्षात चालना दिली जाईल. काँग्रेसच्या काळात आदिवासींना कधी न्याय मिळाला नाही तो मोदींमुळे मिळाला. जे कागदाशिवाय भाषण करू शकत नाही, अशा राहुल गांधींच्या हाती देशाची सत्ता सोपवणार का? असा प्रश्न डॉक्टर हिना गावित यांनी उपस्थित केला.

काँग्रेसने स्वतःच मुळात कमी जागेवर उमेदवार उभे केले असल्याने काँग्रेसचे नेतृत्वात भक्कम सरकार अस्तित्वात येऊ शकत नाही हे आज स्पष्ट दिसत आहे आणि म्हणून मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या भक्कम सरकारलाच पुन्हा मतदान करावे, असे अमरीश भाई पटेल यांनी याप्रसंगी भाषणात सांगितले.