पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पिथौरागढमध्ये उत्तराखंड राज्यात चार हजार कोटींच्या योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पिथौरागढमधील कैलाश व्ह्यू पॉइंटवरून आदि कैलासाचेही दर्शन केले. उद्घाटन – लोकार्पणप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंडमध्ये 4 हजार कोटी रुपयांची विकास कामे केली जात आहेत. या कामांमुळे गावांना चांगली जोडणी मिळेल आणि लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे लवकरच डोंगरी गावे पूर्णत: विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील. सफरचंद उत्पादनात राज्य अग्रेसर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सफरचंद शेतीसाठी ८०९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशीही घोषणा त्यांनी केली.
वन रँक-वन पेन्शनची त्यांची अनेक दशके जुनी मागणी भाजप सरकारने पूर्ण केली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत केंद्र सरकारने माजी सैनिकांना वन रँक-वन पेन्शन अंतर्गत ७० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे. उत्तराखंडमधील माजी सैनिकांच्या ७५ हजारांहून अधिक कुटुंबांनाही याचा लाभ झाला आहे. डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचीही केंद्र सरकारला काळजी आहे. त्यामुळेच अवघ्या ५ वर्षांत देशातील १३.५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. भारत आपली गरिबी हटवू शकतो याचे हे उदाहरण आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील पवित्र पार्वती कुंडात प्रार्थना केल्यानंतर सैनिकांची भेट घेतली. यासोबतच तेथील स्थानिक लोकांची भेट घेतली. पंतप्रधानांनी यावेळी तेथील स्थानिकांच्या उत्पादनाच्या स्टॉलनाही भेट दिली.