नाशिक : ड्रग्जमाफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडे बोट दाखविल्यानंतर आता शिंदे गटानेही पलटवार केला आहे. संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचे नेते असताना नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ड्रग्जमाफिया ललित पाटील याला उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधण्याचं काम राऊतांनीच केले असा दावा मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी होणे गरजेचे आहे असंही भुसेंनी सांगितले.
दादा भुसे म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. ठाकरे गटाने काल मोर्चा काढला. मोर्चात सहभागी लोकं कशासाठी आलेत हे त्यांना माहिती नाही हे माध्यमांनीच दाखवले. ठाकरे गटाची दुखणी वेगळी आहेत. त्यांची दुखणी लवकरच जनतेसमोर येतील. पोटातील मळमळ वेगळी आहे. काही गोष्टींची त्यांना भीती वाटते. लवकरच बाहेर पडेल. कुठलीही गोष्ट कागदपत्रे, पुरावे याशिवाय बोलणे बरोबर नाही असा इशारा त्यांनी दिला.
ललित पाटलाचे धागेदोरे संजय राऊतांपर्यंत…
त्याचसोबत ललित पाटीलाचे धागेदोरे संजय राऊतांपर्यंत आहेत. त्याचा तपास केला पाहिजे. कारण हाच ललित पाटील याने मातोश्री उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधले. त्याला यांनी शहरप्रमुख केला. आज संजय राऊत मोर्चा काढतायेत. पण याच ललित पाटीलला ड्रग्जचा धंदा करण्यासाठी तुम्ही कवच कुंडल दिली. तुम्ही त्याला पक्षात घेतले नसते तर हा धंदा केला असता का असा सवाल आमदार संजय गायकवाडांनी केला आहे.