ड्रग्ज माफिया ललित पाटीलला कसं पकडलं; पोलिसांनी सांगितला क्लू

मुंबईतील साकी नाका पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली असून ललित पाटील हा पंधरावा आरोपी आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ड्रग्ज प्रकरणी ऑगस्टपासून आमचा तपास सुरु असून आतापर्यंत ३०० कोटींपेक्षा जास्त किमतीचे १५० किलोहून अधिक ड्रग्ज सापडले आहेत. महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलिसांच्या ड्रग फ्री महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नाशिक ड्रग कारखानाप्रकरणी चौकशीमध्ये ललित पाटीलचे नाव आल्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. चेन्नई, बंगरुळू पोलिसांच्या टीमसोबत मिळून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

तसेच ड्रग्ज फॅक्टरीच्या संचालनात आणि ड्रग्ज पुरवठ्यात ललित पाटील आणि भूषण पाटील या दोघांचाच सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. ललित पाटील कुठे होता, कुठे जाणार होता हे तपासातून पुढे येईल. तसेच ससून रुग्णालयातील पलायन संदर्भात पुणे पोलिस तपास करणार असल्याचेही मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

कशी केली अटक?
साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात  ललित पाटील अलगद जाळ्यात फसला. साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंकर साकीनाका पोलीसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत  तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली.

दरम्यान ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे.त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती.  पुणे,नाशिक, इंदोरवरून तो गेला सुरतमध्ये गेला. त्यानंतर पुन्हा नाशिक धुळे, औरंगाबाद करत कर्नाटकात त्याने  प्रवेश केला. या  सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर  एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.