पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग्ज माफिया ललित पाटील हा पळून गेल्यानं खळबळ उडाली होती. मात्र, आता ललित पाटील याने स्वतः रुग्णालयातून पळून जाण्याचं कारण सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
चाकण येथील ड्रग्स प्रकरणात अटक होऊन तीन वर्षे झाली. सर्वोच्च न्यालयातील मोठे वकील लावूनही तीन वर्षांत जामीन मिळाला नाही. आता ससून रुग्णालयातील ड्रग्स प्रकरणात गुन्हा दाखल होईल आणि जन्मभर जेलमध्ये सडावे लागेल या भीतीनेच ससून रुग्णालयातून पळल्याचे ललित पाटीलने चौकशीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ससून रुग्णालयाच्या गेटवरच दोन कोटींच्या मॅफेड्रॉन या अमलीपदार्थांसह ललित पाटीलच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने 1 ऑक्टोबर रोजी अटक केली. यानंतर 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता.
17 दिवसांनी मुंबई पोलिसांनी त्याला बंगळुरू येथून अटक केली होती. यानंतर 30 ऑक्टोबरपर्यंत ललित पाटील मुंबई पोलिसांच्या कोठडीत होता. बुधवारी पुणे पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली असून, त्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, यानंतर एक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, ललित पाटील ससून रुग्णालयातून का पळाला होता? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित पाटील हा चाकण येथील ड्रग्स प्रकरणात 2020 पासून कारागृहात आहे.
तेव्हापासून ललित पाटीलला जामीन मिळावा म्हणून त्याचा भाऊ भूषण पाटील हा प्रयत्न करत होता. यासाठी भूषण पाटील हा दिल्ली येथे जाऊन वकिलांची भेटसुद्धा घेऊन आला होता. मात्र, याला यश येत नव्हते. यातच 1 ऑक्टोबर रोजी ड्रग्स तस्करीप्रकरणी अजून एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पुढचे सगळे आयुष्य जेलमध्ये काढावे लागणार, अशी भीती वाटल्याने ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळाल्याचे चौकशीत समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.