तटस्थ आमदारांच्या भूमिकेचा संभ्रम!

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर बुधवारी दोन्ही गटाच्या नेते व पदाधिकार्‍यांच्या बैठका झाल्या. काका खासदार शरद पवार व पुतण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हाने दिली. अजित पवारांनी काकांनी वेळोवेळी दिलेले निर्देश व केलेले घुमजाव हे तर सर्वसामांन्यांसाठी धक्कादायक ठरले आहे. राजकारणातील ज्येष्ठ नेता असे वागू शकतो यावर दिवसभर सखेद आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच सात ते आठ आमदारांनी दोन्ही गटांकडे जाणे टाळल्याचा विषयही ऐरणीवर आहे. या आमदारांनी दोन्हीकडे जाणे का टाळले, स्पष्ट भूमिका का घेतली नाही? त्यांच्या काही अटी होत्या का? यासह विविध विषयांवर मंथन सुरू आहे.

अजित पवारांचा पहाटेचा शपथविधीने राजकारण्यांची त्यावेळी झोप उडविली. तर यावेळी सर्वच ‘संडेमुड’मध्ये असताना विविध वाहिन्यांवर स्पर्धा सुरू झाली. अजित पवार यांचे धक्कातंत्र आणि त्या पाठोपाठ नऊ जणांचा शपथविधी सारेच गोंधळ निर्माण करणारे ठरले. जे करतील ते बेधडक असा लौकीक असलेल्या अजित पवार यांनी शपथविधी घेत नंतर पक्षावर व पक्ष चिन्हावर दावा केल्याने हा विषय आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. हे करत असताना अजित पवार यांनी  पहिल्या हल्ल्यात आपली बाजू मजबुत करून घेतली आहे हे तेवढेच खरे. त्यांच्या जोडीला राजकारणातील संपूर्ण प्रगल्भता  आणि शरद पवारांचे डावपेच संपूर्ण जाणून असलेला  नेता म्हणजे खा. प्रफुल्ल पटेल हे आहेत. बुधवारी दोन्ही गटांकडून मेळावे झाले. राज्यभरातून कार्यकर्ते, स्थानिक नेते आपापल्या गटांच्या मेळाव्यांना हजर होते. अजित पवार यांच्या गटाकडे 32 तर शरद पवारांच्या गटाकडे 16 आमदार मेळाव्यांना हजर होते.  यात अजित पवार यांच्या गटाच्या मेळाव्यात त्यांनी काही गौप्यस्फोट केले व कार्यकर्त्यांसमोर आपले मन मोकळे केले. 2014 मध्ये वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला जाण्याच्या शरद पवारांच्या सूचना होत्या. त्यावेळी आमची इच्छा नव्हती पण  एका आमदारास धमकावले गेले.

देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच्या शपथविधीच्या सूचनाही  त्यावेळी शरद पवारांनी दिल्या होत्या आणि नंतर माघारी फिरण्याचे आदेशही त्यांचेच होते. महाविकास आघाडीच्या काळात भाजप बरोबर सत्तेत सहभागी होण्याच्या बैठकांबाबतही अजित पवारांनी माहिती देऊन वेळोवेळी कसे तोंडघशी पाडले गेले, असे धक्कातंत्र अजितदादांनी अवलंबिले. तर शरद पवार गटाकडून अजूनही बाहेर पडलेल्या 32 आमदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला पांडूरंग म्हणायचे आणि माझ्याकडे दुर्लक्ष करायचे. एकंदरीत अजित पवांच्या कालच्या बेधडक भाषणातून अजूनही ते दैवत मानत असलेल्या शरद पवारांचा हटवादीपणाच अधोरेखीत झाला आहे. तसेच घराणेशाहित रक्ताची नाती ही कतृत्वापेक्षा मोठी ठरतात, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. अजित पवारांचे भाषण महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरले आहे. त्यामुळेच तब्बल 32 आमदार त्यांच्या पाठीशी आले तर आणखी काही रांगेत आहेत. यातून अजित पवार हे राष्ट्रवादीतील खंबीर नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. सर्वसमावेशक व रोखठोक भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे खरे नेतृत्व कोणत्या पवारांच्या हाती आहे, याची प्रचिती आली आहे.

मेळाव्यास 32 आमदारांनी हजेरी लावली असली तरी हा आकडा चाळीशीपार होईल, अशी दबकत चर्चा सुरू आहे. यात आठ जणांनी तटस्थ रहाण्याची भूमिका घेतली. यात नबाब मलीक हे अजित पवारांच्या बाजुने असल्याचे सांगितले जाते मात्र ते जेलमध्ये आहेत. याशिवाय मकरंद पाटील (वाई), राजू नवघरे (वसमत), दौतल दरोडा (शहापूर), सरोज अहिरे (देवळाली), अशुतोष काळे (कोपरगाव) आदींची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही. यात त्यांच्या काही अटी आहेत की ते भूमिका ठरवू शकले नाहीत, हे येत्या काळात समोर येईलच. आजच्या घडीला अजित पवार हे आघाडी घेऊन आहेत मात्र पवारांच्या सावलीतून बाहेर पडून त्यांना राजकीय कसोटीवर स्वत:ला सिद्ध करावे लागणार असून आपली शक्ती अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

 

– शब्दवेध
चंद्रशेखर जोशी