मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी व एनडीए विरोधकांच्या आघाडीचे कुणीही संयोजक झाले तरी काहीही होणार नाही. ते केवळ डबक्यात उड्या मारतील व डबक्यातच राहतील, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, विरोधकांच्या आघाडीचे लोक देशव्यापी काहीच करू शकणार नाहीत. विरोधकांत असलेल्या काही पक्षांचा प्रभाव साडेतीन जिल्ह्यात तर किंचित सेना कोकणापुरती मर्यादित आहे. त्यांच्या बैठका केवळ नावापुरत्या आहेत. कुणाला विरोधीपक्ष नेता बनविण्याएवढ्या जागाही मिळणार नाही. स्वत: सर्व्हे करून आपले नाव उद्धव ठाकरे यांनी पुढे केले आहे. कोणताही सर्व्हे आला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच होतील, असे ते म्हणाले.
विरोधकांच्याआघाडीचा प्रयोग नवीन नाही यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. नव्या आघाडीतील अनेक नेते दुरावले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह गेला आहे. केवळ दिखाव्यासाठी बैठका घेत आहेत. एनडीएच्या बैठका झाल्या आहेत. महाराष्ट्रात एनडीएमधील पक्षांना किती जागा आहेत त्याविषयी विभागानुसार बैठक घेणार आहोत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र सरकारमधील तिन्ही प्रमुख नेत्यांना एकमेकांचे निर्णय माहिती असावे यासाठी काही निर्णय घेण्यात आले असतील. एखादा निर्णय होताना चार लोकांनी घेतलेला निर्णय अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाठी हा महत्वाचा निर्णय असून त्या निर्णयाचे स्वागत करतो. त्यामुळे एखाद्या नेत्याने घेतलेल्या निर्णयात दुसऱ्या नेता आणखी एडिशन करत असल्यास त्यांच्या निर्णयाची ताकदच वाढेल.