उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात शरद पवारांवर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील महत्वाचे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. मात्र, ज्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याने तयार झालेले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पवारांची भेट घेणे टाळले होते. याची खंत स्वतः खासदार संजय राऊतांनी बोलून दाखविली होती. असा खळबळजनक गौप्यस्फोट सुनील तटकरेंनी पत्रकार परिषदेत केला आहे.
राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीका करताना संजय राऊतांनी ‘सामना’तून अग्रलेख लिहीत अजितदादांवर टीका केली आहे. संजय राऊतांनी अजित पवारांचा उल्लेख सिंचनदादा असाही केला आहे. सिल्वर ओक आणि मातोश्री या दोन स्थानांमध्ये अडकलेले संजय राऊत, असा उल्लेखही तटकरेंनी केला आहे. संजय राऊतांनी सुनील तटकरेंशी खासगीत केलेले संवाद नेमके काय होते याबद्दल तटकरेंनी खुलासा केला आहे. “अजितदादांचा राग आल्यानंतर उद्धव ठाकरेंना भाजप सोबत सत्तेत जायचं होतं”, असेही तटकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “खासदार संजय राऊतांनी माझ्याकडे येऊन वारंवार उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीबद्दल तक्रारी केल्या. ‘पवार आजारी असताना तो साधा भेटायलाही येऊ शकत नाही का?’ असा उद्विग्न सवालही राऊतांनी माझ्याकडे केला होता. उद्धव ठाकरेंचा उल्लेख ते एकेरी करतात.
त्याबद्दलच त्यांचं सलोखा तितका असेल. मला माहीत नाही. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी जेव्हा उद्धव ठाकरे गेले तेव्हा अजितदादांना उपमुख्यमंत्री म्हणून का नेलं नाही, याचा राग संजय राऊतांना आला. तेव्हा माझ्याशी बोलून राऊत अजितदादांची वेळ मागत होते.”, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.