पुणे : आर्थिक अडचणीत असलेल्या एका ३५ वर्षीय तरुणानं आत्महत्या करणार असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवरुन जवळच्या व्यक्तींना पाठवला. हा मेसेज वाचून खळबळ उडाली. दरम्यान, अवघ्या तीन मिनिटात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलीस यांच्या सहाय्याने त्या तरुणाचा जीव वाचवण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते. ही बाब कळाल्यावर विषयाचे गांभीर्य बघत त्यांनी बरोबर असलेल्या पोलिसांना तत्परतेने या मुलाचा शोध घ्यायला संगितला आणि पुढील काही मिनिटात पोलीस कामाला लागले. त्या मुलाचा नंबर घेऊन पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक केले आणि त्याचा शोध घेतला. पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा आत्महत्या करणारा व्यक्ती राहत होता. त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी आधी त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याचं समुपदेशन करून त्याला आत्महत्येच्या विचारापासून दूर नेलं. पुढील काही दिवस पोलीस त्याचं समुपदेशन करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मेसेजमध्ये काय लिहिलेलं?
“माझ्या चुकांमुळे मी आर्थिकदृष्टया अडचणीत आलोय. मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण अजून होत नाहीये. मला खूप वाईट वाटत आहे, पण परिस्थितीने मला असे करण्यास भाग पाडले आहे. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे. यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, याला सर्वस्वी फक्त मीच जबाबदार आहे” अशा आशयाचा मेसेज एका 35 वर्षीय तरुणाने सोमवारी दुपारी 2 च्या सुमारे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्याच्या जवळच्या व्यक्तींना पाठवला. सुरुवातीला हा मेसेज बघून सगळेच घाबरले मात्र त्यातील एका व्यक्तीने हा मेसेज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिसांना पाठवला आणि मग सगळी चक्र फिरली.