तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव; पोलीसही चक्रावले

धुळे : साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. खुद्द तरुणीनेच पोलिसांना ही माहिती दिल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

पिस्टल व चाकू लावून दरोडेखोरांनी साक्री शहरात घरातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण अठ्ठयाऐंशी हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. महत्त्वाचं म्हणजे घरातील २१ वर्षीय तरुणीचं अपहरण केलं होतं. ही घटना शनिवार, २५ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजता घडली होती. दरोड्यानंतर युवतीच्या झालेल्या अपहरणाने पोलीस प्रशासनही चक्रावले होते. या प्रकरणी साक्रीपो लीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. त्या अनुषंगाने तपासचक्र फिरवून तरूणीचा शोध घेऊन आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केल्यानंतर तरुणीने स्वतःच अपहरणाचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यातील आरोपी विनोद भरत नाशिककर (वय ३८) रा. गायत्री नगर, शिव मंदिर समोर शाजापूर, सौर उर्जा ठेकेदार मध्य प्रदेश व धुळ्यातील रोहित संजय गवळी (वय २२) रा. मोगलाई या दोघांना मध्य प्रदेश राज्यातून अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद नाशिककर हा साक्रीतील आदर्श नगर मधील संबंधित तरूणीच्या घराशेजारी भाडेकरी म्हणून वास्तव्याला होता. त्यावेळी संबंधित तरूणीशी विनोदची ओळख झाली होती. त्यानंतर शाजापूर येथे परिवारासह राहायला गेल्यानंतरही संबंधित तरूणी त्याच्या संपर्कात होती. विनोद नाशिककर व तरूणी यांनी घरातून पळून जाण्यासाठी दरोडा टाकण्याचा कट रचला.

आदर्श नगरातून पळून जाणे शक्य नसल्याने तरूणी आत्याच्या घरी सरस्वती नगरात राहण्यासाठी गेली. रचलेल्या कटानुसार विनोद नाशिककर याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या अमनसिंग व चरणसिंग यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आणखी दोघांना बोलवून हा सर्व बनाव रचला. ठरल्यानुसार संबंधित तरूणीने रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याबाबत विनोदला सांगितले.

ठरल्यानुसार दरोडा टाकण्यात आला. संबंधित तरूणी, विनोद व त्याचे चारही साथीदार दरोडा झाल्यानंतर साक्रीतून रायपूरबारी येथे पोहोचले. तेथून रोहित संजय गवळी याने तरूणी व विनोद वगळता इतर चौघांना रतलाम रेल्वे स्टेशनला सोडले. आरोपी विनोद व तरूणी चारचाकी कारने सर्व टोलनाके वगळून शाजापूर पर्यंत पोहोचले. या काळात विनोद नाशिककर संबंधित तरूणीच्या वडिलांच्या संपर्कात राहून घडलेल्या घटनेची माहिती घेत होता.

या सर्व घटनेचे गांभीर्य ओळखून विनोदने तरूणीला पंधराशे रुपये देऊन ट्रॅव्हल्सने परत पाठविले. ट्रॅव्हल्समधून तरूणीने कोणत्यातरी प्रवाशाच्या मोबाईलवरून विनोदच्या मोबाईलवर कॉल केला व तरूणी मध्यप्रदेश येथील सेंधवा येथे असल्याची माहिती धुळे पोलिसांना मिळाली. तरूणीला घेऊन पोलिसांनी आई वडिलांच्या ताब्यात दिले. तरूणीने आई वडिलांच्या मोबाईलवरून विनोद याला फोन करून साक्रीत पोहोचल्याचे सांगितले तसेच मोबाईल फॉरमॅट करून टाकण्याचे सांगितले. त्यानुसार विनोदने मोबाईल फॉरमॅट देखील केला.

मात्र हा बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच संबंधित तरुणीला पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व हकिगत पोलिसांना सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी विनोद नाशिककर याला अटक करून पुढील तपास करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.