धुळे : यात्रेत कोणत्यातरी मुली सोबत फिरत असल्याची माहिती पत्नीला दिल्याच्या कारणावरून एकाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील शेंदवड येथे घडली. पोलिसांनी संशयित आरोपी सुनील चौरे याला ताब्यात घेतलेय.
पोलीस सूत्रानुसार, सदर प्रकरणातील संशयित आरोपी ग्रामसेवक सुनील धुडकू चौरे ( ३६, मूळ गाव शेंदवड, ता. साक्री, जि. धुळे, ह. मु हरिओमनगर, पिंपळनेर, ता. साक्री) हा शेंदवड येथील यात्रेत एका मुलीसोबत फिरत होता. या दोघांना शालक चंदू याने पहिले. चंदूने याची माहिती सुनीलच्या पत्नीला फोनवरून दिली होती. याबाबत सुनील चौरे व पत्नी रेखा यांच्यात वाद सुरु झाले. यामुळे सुनील व रेखाने चंदूला २४ फेब्रुवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास शेंदवड येथे बोलवले.
दरम्यान २५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुनीलने चंदूला शिवीगाळ करून मारहाण केली. या दरम्यान चंदूचा गळा दाबून त्याला ठार केले. भाऊ अशोक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाली. संशयित सुनील चौरे यास पिंपळनेर पोलिसांनी अटक केली. पोसई बी. जी. शेवाळे तपास करीत आहेत.