‘तरुण भारत’चे माजी निवासी संपादक चंदू नेवे यांचे निधन

जळगाव : ‘दैनिक तरुण भारत’चे माजी निवासी संपादक व ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल देविदास नेवे (वय 68) यांचे दि.15 रोजी रात्री 11 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा व दोन मुले व सून असा परिवार आहे.

एक व्यासंगी व अभ्यासू पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले चंदुलाल नेवे हे मूळचे यावल तालुक्यातील साकळी येथील रहिवासी आहेत. ते नुकतेच नेपाळ व उत्तर भारताच्या पर्यटन दौर्‍यावर गेले होते. तेथे असतानाच त्यांचे निधन झाले.

त्यांचे पार्थिव जळगाव येथे नानीबाई हॉस्पिटलजवळ, ईश्वर कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी दि.17 रोजी आणले जाणार आहे. सायंकाळी अंत्ययात्रा राहत्या घरापासूनच निघेल.

वकिली व्यवसाय करता करता पत्रकारितेकडे वळत प्रारंभी दैनिक गावकरी, नंतर लोकमत व तरुण भारतमध्ये त्यांनी काम केले. ‘तरुण भारत’मध्ये निवासी संपादक म्हणून ते साडेतीन वर्षे कार्यरत होते. या काळात ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तकही लिहिले. त्यांना पत्रकारितेतील ‘भाला’कार भोपटकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांनी शोकभावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. ते कल्पेश व मयूर नेवे यांचे वडील होत.