तर अमोल मिटकरी यांचा राऊत होईल; काँग्रेसने काढली इज्जत

मुंबई : मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद कोणाकडे असेल, यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेते विरोधी पक्षनेते पदाबाबत दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. विरोधीपक्षावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका विधानावरुन अमोल मिटकरी यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने एका दगडात दोन पक्षी मारत राऊत व मिटकरी दोघांवर टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले की, अमोल मिटकरी यांच्या अशा वक्तव्यामुळेचा त्यांचेही संजय राऊत होईल. विरोधी पक्ष नेता कोण असेल? याचा निर्णय संख्याबळावर होत असतो. विधान परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे नऊ, नऊ जागा होत्या. मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागा कमी झाल्या. परंतु यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यामध्ये इतरांनी लुडबुड करु नये.

अमोल मिटकरी यांनी आता कुठेतरी थांबले पाहिजे. त्यांच्यात उद्याचा संजय राऊत दिसत आहे. मिटकरी यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबले तर ते महाराष्ट्रात नेते म्हणून परिचत होतील अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत कुलकर्णी यांनी हल्लाबोल केला.

काय म्हणाले होते मिटकरी
विधान परिषदेत आता बरोबरीचे संख्याबळ आहे. जर महाविकास आघाडीने ठरवून निर्णय घेतला. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावे. भाजपला वेठीस धरायचे असेल आणि त्यांची कोंडी करायची असेल, तर एकनाथ खडसे हे अभ्यासू नेते आहेत. त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात यावी, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.