…तर आयटीआर भरणार्‍यांना ५,००० रुपये दंड भरावा लागेल

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यासाठी ३१ जुलै २०२३ ही अखेरची तारीख असेल. याअंतर्गत टॅक्सेबल इनकम असलेल्या लोकांना आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ३१ जुलैपर्यंत आयटीआर दाखल करावा लागेल. अशात आपण ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरू शकला नाहीत, तर आपल्याकडे ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत असेल. ३१ डिसेंबरपर्यंत आपण लेट रिटर्न फाइलसह आयटीआर फाइल करू शकता. यात आपल्याला ५,००० रुपये एवढा दंड भरावा लागेल.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून फेब्रुवारी महिन्यात आयटीआर फॉर्म जारी करण्यात आले होते. नोकरी करणार्‍या लोकांसाठीही कंपन्यांकडून फॉर्म-१६ जारी करण्यात आला होता. आता जस-जशी ३१ जुलै तारीख जवळ येईल, तस-तसे इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर ट्रॅफिक वाढत जाईल. यामुळे आपण वेळीच आयटीआर फाईल करणे आवश्यक आहे.

आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२३ नंतर आयटीआर भरणार्‍यांना ५,००० रुपये दंड भरावा लागेल. तसेच यानंतरही, जर देय तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही, तर यानंतर रक्कम दुप्पट होऊ शकते.