…तर इंडिया आघाडीच्या जागा वाटपावरही होणार परिणाम ?

Maharashtra Politics : राज्यात येत्या काही महिन्यांत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणूक असल्याने सध्या सर्वत्र निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष्ा निवडणूकपूर्व तयारींना लागले आहेत. अशातच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष गमावण्याचा धोका असल्याने आगामी निवडणूक कुठल्या चिन्हावर लढायची याची चिंता शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व समर्थकांना सतावू लागली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही याचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ घरोघरी पोहचवले आहे. त्या बळावर तब्बल पंधरा वर्षे सलग आघाडीचे सरकार राज्यात होते. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा अवस्था झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात तब्बल ४० आमदार महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत.

आमदार व खासदांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हवाली केला. हाच न्याय व निकष राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा न्याय निवाडा करताना लावण्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तरी आघामी काळात काय घडेल ? हे येत्या महिन्यात समोर येईलच…