मुंबई : कर्नाटक सरकारच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या बागलकोट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने स्थानिकांमधून काँग्रेस सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. भाजप नेते आमदार यांनी काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराच दिला आहे.
नितेश राणे म्हणाले, “जेव्हापासुन कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आले आहे, तेव्हापासुन सातत्याने हिंदु विरोधी भुमिका घेणे सुरु आहे. हिंदूंवर हल्ले केले जात आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात आहेत. लव जिहाद कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने रातोरात हटवला गेला. हा लाखो, करोडो शिवभक्तांचा अपमान आहे.”
“याबाबत कर्नाटक काँग्रेस सोडा, पण महाराष्ट्र कॉंग्रेस नेत्यांनी त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेते जे शिवरायांच्या नावाने राजकारण करतात त्यांनी या पुतळ्याला परत बसवण्यासाठी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाही तर महाराष्ट्रात त्यांना फिरू द्यायचे का नाही, याचा विचार सामान्य जनता निश्चित पद्धतीने करेल.” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.