धुळे : शेतकऱ्यांचा हंगाम सुकर होण्यासाठी आवश्यक सर्व बाबीं मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करावे. खरीप पीक कर्ज वेळेत वितरित करावे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता बॅंकांनी घ्यावी. ज्या बँका पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. जिल्ह्यातील पीक लागवड लक्षात घेऊन आवश्यक ते बी-बियाणे, खते व कृषी निविष्ठा मुबलक उपलब्ध ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
पिकाची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे विक्री होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री महाजन यांनी सोमवारी ऑनलाइन खरीपपूर्व हंगाम आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद सभापती संजीवनी शिसोदे ऑनलाइन सहभागी झाले.
यंत्रणेस तपासणीचा आदेश
बी-बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही तसेच, जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे व खते विक्री होणार नाही यासाठी कृषी विभागाने खते व बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. तसेच, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण म्हणून शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत मार्गदर्शन करावे. शिवाय शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजनांची माहिती द्यावी. जिल्ह्यात फळबाग लागवड वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित आहे. यास अनुसरून तृणधान्याचे लागवड क्षेत्र वाढीसाठी आवश्यक प्रयत्न व्हावेत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली.
पाच भरारी पथके
जिल्हास्तरावर एक, तर तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण पाच गुणनियंत्रण भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात बी-बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांनी बैठकीत दिली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. त्यावर आवश्यक कार्यवाहीच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
बियाणे, खतांची स्थिती
जिल्ह्यात खरीप हंगाम लागवडीचे क्षेत्र ३ लाख ८४ हजार १५९ हेक्टर आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे असून नंतर मका, बाजरी, सोयाबीन, ज्वारीचे क्षेत्र आहे. कापूस लागवडीसाठी १० लाख ३० हजार ६४० बीटी कापूस बियाणे पाकिटांची आवश्यकता आहे. या वर्षासाठी ९४ हजार ३८० टन खतांचे आवंटन मंजूर असून पैकी ४७ हजार ४७२ टन खताचा साठा शिल्लक असल्याचे यंत्रणेने सांगितले.