मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली असून यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे होते. शरम वाटली पाहिजे. कुणाचे सुपुत्र आहोत आपण? हे विसरलात का? आमच्यावर जर निवडणुका जिंकण्यासाठी पाकिस्तानचा झेंडा हातात घेण्याची वेळ आली असती तर राजकारणातून निवृत्ती घेतली असती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांना माझा साधा प्रश्न आहे. इतकी वर्ष हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो अशी केली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे राजकारणात आले. तुम्हीही राजकारणात आल्यापासून ते ही निवडणूक सुरू होण्यापर्यंत माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो… अशी भाषणाची सुरुवात करायचा. पण इंडिया आघाडीच्या सभेत तुम्ही हिंदू म्हणणं टाळलं. देशभक्त बांधवंनो म्हणायला हरकत नाही. पण हिंदू का सोडलं?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हिंदू म्हणायची लाज वाटते तुम्हाला? ते हिंदू म्हणूच शकत नाही. कारण ज्यांच्या भरवश्यावर निवडणुका जिंकायच्या आहेत, त्यांना राग येईल, ते नाराज होतील, ही भीती मनात असल्यामुळेच त्यांनी भाषणातून हिंदू म्हणणं सोडलं. उद्धव ठाकरेंच्या रॅलीत अल्ला हू अकबरचे नारे दिले गेले. हे बाळासाहेबांनी खपवून घेतलं नसतं.