…तर राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही; छगन भुजबळ असं का म्हणाले?

मुंबई : हिवाळी अधिवेशन उद्या ७ डिसेंबर रोजीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे. संत्रानगरीत उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल.दरम्यान, आज नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी दाखल होताच छगन भुजबळ यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकीच नव्हती, तर भुजबळांच्या मनातील नैराश्य आणि रोष प्रकट करणारी ही होती. राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात आली आहे. पण, आता त्याचा काही फायदा होणार नाही. कारण, सर्व मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता बाहेर कोणीच राहणार नाहीये. मागासवर्गातील सर्व लोक राजीनामा देत आहेत. कारण आता ओबीसीचा आयोग राहिलेला नाही तर मराठा आयोग झाला आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.

दरम्यान, सध्याच्या राज्यातील प्रश्नांना घेऊन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या काळात विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास 100 मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती आहे. यातच्या 45 पेक्षा जास्त मोर्चांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सभागृहासह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनांनी यंदाचं अधिवेशन गाजणार आहे.