जळगाव जिल्ह्यात काय घडतंय? तलाठ्यास चाकाखाली दाबून चिरडण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

जळगाव: वाळूची अवैध, चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर कारवाई करणाऱ्या महसूल पथकातील एका तलाठ्यास चाकाखाली दाबून चिरडण्याचा प्रयत्न झाला. यादरम्यान कर्मचाऱ्यांना लाठ्याकाठ्यानी तसेच हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार, १९ रोजी सकाळी ६ वाजता अमळनेर तालुक्यातील नांद्री रस्त्यावरील दहिवद गावाजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुध्द अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संदीप रामदास शिंदे हे रणाईचे, ता. अमळनेर येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. अमळनेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांनी महसूल पथक तयार केले आहे. त्यात संदीप शिंदे यांच्यासह योगेश रमेश पाटील, मंडळ अधिकारी हेडावे, नंदगावचे तलाठी प्रकाश बारकू महाजन, डांगर बुद्रुकचे तलाठी मधुकर राजधर पाटील यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

रविवार, १९ रोजी पहाटे ५ हे पथक अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी वाहनाने पातोंडा-दहिवद शिवारात गस्त घालत होते. सकाळी ६ वाजेच्या सुमारास नांद्री ते दहिवद गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नांद्री गावाकडून दहिवदकडे ट्रॅक्टर येताना पथकाला दिसले. पथकाने हे ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये एक ब्रॉस वाळू भरलेली दिसली. चौकशीत ट्रॅक्टरचालकाने योगेश संतोष पाटील असे नाव सांगितले. वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याची बाब उघड झाल्यानंतर पथकाने हे वाहन सोबत घेऊन चालण्याबाबत सांगितले. यावर चालकाने नकार देत पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मारण्यासाठी माणसे बोलवितो, अशी धमकी देत वाहन सोडून पळून गेला.

विना क्रमांकाचे हे ट्रॅक्टर घेऊन जाण्यासाठी तलाठी हे कार्यवाही करीत असताना दोन दुचाकी क्र. एमएच- १९-डीएम-०५२८ तसेच दुचाकी क्र. एमएच- २१-बी-२९९२ घेऊन चौघे आले. त्यात भूषण उर्फ सोनू राजेंद्र देवरे (पातोंडा) सोबत ट्रॅक्टर सोडून पळून गेलेला चालक योगेश हा होता. या चौघांनी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करू लागले. तलाठी शिंदे हे ट्रॅक्टरवर उभे असताना भूषण देवरे तसेच त्याचा एक साथीदार अशा दोघांनी त्यांना ट्रॅक्टरवरुन खाली ओढले. लाथाबुक्क्यांनी तलाठी शिंदे यांना मारहाण करून त्यांना ट्रॅक्टरसमोर आडवे पाडले. चालक योगेश याने ट्रॅक्टरवर चढत ताबा घेत तलाठी शिंदे यांना ट्रॅक्टरच्या चाकाखाली दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी तलाठी शिंदे यांना चाकापासून बाजुला ओढून घेतले.

भूषण देवरे तसेच त्याचे अन्य साथीदारांनी लाठ्याकाठ्यांनी शिंदे यांच्यासह पथकातील प्रकाश महाजन यांना मारहाण केली. यात शिंदे यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. डाव्या मांडीवर, उजवे गुडघ्यावर मार लागला. प्रकाश महाजन यांच्या दोन्ही पायांना व डोक्याला मार लागला. पथकातील कर्मचाऱ्याने पोलिसांना खबर दिली. पोलीस येत असल्याचे लक्षात आल्याने संशयितांनी कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वाहने सोडून पलायन केले. पोलिसांनी वाहने जप्त केली. याप्रकरणी योगेश संतोष पाटील, भूषण राजेंद्र देवरे तसेच दोन अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.