तळोदा : तालुक्यातील काजीपूर शिवारात आजी व नातवाचा बळी घेणाऱ्या तीन बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केले होते. हे तिन्ही बिबटे गत १० दिवसांपासून तळोदा उपवनसंरक्षक कार्यालयात मुक्कामी होते. यातील एक बिबट्या नागपूर येथे रवाना करण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली. तर इतर बिबटे आज गुरुवारी बोरिवली व जुन्नरकडे रवाना होण्याची शक्यता आहे.
वनविभागाने जेरबंद केलेल्या तिघा बिबट्यांना जुन्नर जि. पुणे, नागपूर आणि बोरीवली येथे पाठवण्यास नागपूर येथील वन विभागाच्या प्रधान वनसंरक्षक कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली होती. परंतु बिबट्यांसाठी जागा होत नसल्याने त्यांच्या रवानगीचे आदेश मिळाले नव्हते. यामुळे तळोदा मेवासी वनविभाग कार्यालय आवारात बिबट्यांचा मुक्काम होता.
याठिकाणी बिबट्यांना पाहण्यासाठी नागरिक दर दिवशी गर्दी करत असल्याचे दिसून येत होते.
बुधवारी दुपारी पहिला बिबट्या नागपूरकडे रवाना करण्यात आला. याठिकाणी अद्यापही दोन बिबट असून यातील एकाला निवारा केंद्र जुन्नर जि. पुणे तर दुसऱ्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली जि. ठाणे येथे पाठवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी हे बिबट येथून रवाना होण्याची शक्यता आहे.
तळोदा वनक्षेत्रात पाऊस पडत असल्याने संचार करणाऱ्या बिबट्यांच्या पावलांचे ठसे दिसून येत नसल्याने शेतकरी तसेच शेतशिवारात जाणाऱ्या मजुरांनी दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.