तळोद्यात आणखी एक बिबट्या जेरबंद, नागरिकांमध्ये भीती कायम

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील काजीपुर शिवारात अद्याप बिबट्यांची दहशत संपलेली नाही. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटे आणखी एक बिबट्या जेरबंद झाला. महिनाभरात चौथा बिबट्या येथे जेरबंद झाला आहे. या परिसरात आणखी बिबट्यांचा संचार असून, बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

तळोदा तालुक्यात महिनाभरात चार बिबटे जेरबंद झाले आहेत. याआधी २१ ऑगस्ट रोजी पहिला बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २२ ऑगस्टला दोन बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले होते.

त्यानंतरही या भागात पुन्हा  बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून आल्यानंतर आणखी पिंजरा लावण्यात आला. त्यात मंगळवारी पहाटे चौथा बिबट्या अडकला. मात्र, या परिसरात आणखी बिबट्यांचा संचार असल्याचे शेतकरी, शेतमजुर यांचे म्हणणे आहे.

तळोदा शहारातील खर्डी नदी जवळ डिंबी हट्टी परिसरात बिबटया फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

वनविभागाकडून रात्री गस्त
वनविभागाकडून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्यात येत आहे. बिबटयाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी थर्मल इमेज ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.