मनोज माळी
तळोदा : शहरातील चिनोदा चौफुली जवळ मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रंजय कुमार रामदास पासवान (33, रा. जितपुर बिहार ) असे इसमाचे नाव आहे. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातील चिनोदा चौफुली जवळ देवींदर कुळमी (समस्तीपूर जि. बिहार) यांचे कुटुंब वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे एक अनोळखी रंजय नावाचा बिहारी फिरस्ता इसम रात्री 12 वाजता आश्रयासाठी आला. देवींदर कुळमी याने त्यास जेवण देऊन झोपण्यासाठी पांघरून दिले.
नंतर काहीवेळाने अनोळखी रंजय कुमार रामदास पासवान (33 रा .जितपुर बिहार) हा मोबाईल व काही पैसे चोरून फरार झाल्याचा संशय देवींदर यास आला. त्यांनी त्यास बसस्टॉप जवळून पकडून आणले. पेट्रोल पंप समोरील शॉपिंग समोर त्यास दोरीने बांधून काठीने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनोळखी रंजय पासवान यास तळोदा पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मयत घोषित केले. मयत इसमास मारहाण करणारे 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशीत कांबळे सहा पोलीस अधीक्षक दर्शन दुगड, स्थानिक गुन्हा अन्वेषण पो नि किरणकुमार खेडकर अकलकुव्वा पो नि गुलाबराव पाटील तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. तळोदा पोलीस ठाण्यात पुढील तपास करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.