तळोद्यात पुन्हा दोन बिबटे जेरबंद, आणखी दोन बिबट्यांचा मुक्त संचार !

तळोदा : तालुक्यातील काजीपूर शिवारात आजी साखराबाई तडवी व नातू श्रावण तडवी यांना ठार करणारा नरभक्षक बिबट्या बुधवार, २१ रोजी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. दरम्यान, आणखी बिबटे असल्याचे  नागरिकांनी सांगितले. वनविभागाने पुन्हा पिंजरा लावला असता, दोन बिबटे जेरबंद झालेय. मात्र, आणखी दोन बिबट्यांचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.

तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात मंगळवारी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला करून बिबट्याने तिला ठार केले होते; नंतर तिच्या शोधासाठी गेलेल्या नातूवरदेखील बिबट्याने हल्ला करून त्यालादेखील ठार केले. या दुर्दैवी व थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतर वनविभागाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. ज्या ठिकाणी श्रावण तडवी या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता, त्याच ठिकाणी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. पिंजऱ्यात शेळी बांधण्यात आली होती. रात्री बारा वाजेपर्यंत वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पहारा देत होते. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावरून परतल्यानंतर रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्या शेळी खाण्यासाठी पिंजऱ्यात अडकला.

दरम्यान, आणखी बिबट्ये असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनविभागाने पुन्हा पिंजरा लावला असता, आज २२ रोजी  दोन बिबट्ये जेरबंद झाले आहे. मात्र, आणखी दोन बिबट्याचा मुक्त संचार आहे. आज सकाळी १० वाजेदरम्यान चिनोदा गावाकडून दोन बिबटे काजीपुर-कोठार रस्ता ओलांडून शेतात गेल्याचा दावा, काजीपुर गावातील ग्रामस्थानी केला आहे.

तीन बिबट्यानं जेरबंद केल्यानंतर येथील सुटकेचा निःश्वास सोडला असताना, पुन्हा बिबटे दिसून आल्याने नागरिकांमध्ये  पुन्हा भितीचे वातावरण आहे. शिवाय या बिबटयाना जेरंबद करण्याचे आव्हान वनविभागा समोर येवून ठेपले आहे.