तळोदा : येथील प्रसिद्ध व्यापारी यांचे दुकान व गोडाऊन्समधील गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचा साधारण 23 लाखाचा विना परवाना मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. यामुळे तळोदात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तळोदा शहरातील प्रख्यात व्यापारी, संस्थाचालक, को.ऑप. बँकेचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणुन नुकतीच निवड झालेले निखिलकुमार नेमीचंद तुरखिया यांच्या तळोदा गावात मेनबाजार पेठेतील मालकीचे दुकानात, गोडाऊन, शॉपिंग मध्ये पांढऱ्या रंगाच्या गोण्या त्यात नवसागर, राखाडी रंगाचे पोते त्यात काळा गुळ, जमिनीवर पडलेले साखरेचे व गुळाचे मिश्रण, काळया गुळाच्या भेल्या, निळ्या रंगाचा गोण्या त्यामधील काळा गूळ तसच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील मे. मोतीलाल जयचंद अँड कंपनी या नावाच्या शॉपिंग मध्ये गावठी हात भट्टी दारू तयार करण्याचा मुद्देमाल विना परवाना आपल्या दुकानात, गोडाऊन मध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवताना मिळून आला असल्याचा व सर्व ठिकाणाहून एकुण 23 लाख 28 हजाराचा मुद्देमाल मिळाला. त्यामुळे दारूबंदी कायदा कलम 65 (फ) अंतर्गत पोलिसांत गु.र.नं 21/2024 अन्वये तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी केली असून, यांच्याच मार्गदर्शनाखाली तळोदा पोलिस निरीक्षक राहुल पवार, अक्कलकुवा पी.एस.आय नांद्रे, तळोदा पी.एस.आय सागर गाडीलोहार, पी.एस.आय पवार ई.नी कारवाई केली. दरम्यान मुद्देमाल सापडलेले तीन गोडाऊन व दुकान पुढील कारवाईस्तव सिल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आमितकुमार बागुल करीत आहेत.