..तसं रामायण वाल्मिकींनी लिहिलं; भालचंद्र नेमाडेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

जळगाव । एकीकडे अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून यामुळे रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण अशा वातावरणात आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण आणि प्रभू रामांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वाल्मिकींनी लिहिलेलं रामायणच खरं हे कसं काय मान्य करायचं? त्याआधी रामायण लिहिलं गेलं आहे. चंगेझ खानला रामायण आवडत होतं असाही उल्लेख त्यांनी केला. वाल्मिकी हा श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. शृंगांना जसं आवडलं तसं रामायण वाल्मिकी यांनी लिहिलं. तसेच राम हा शाकाहारी होता का मांसाहारी होता यावर चर्चा कशाला हवी? ते खोलात जावून शोधलं पाहिजे.

भालचंद्र नेमाडेंच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची चिन्हं आहेत. जळगावातील भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात ते बोलत होते. “अनेक रामायणांमध्ये राम वेगळा आहे. एका रामायणात तर चक्क राम आणि सीता हे बहिणी-बहिणी आहेत. एका रामायणात तर सीता ही रामाला अक्कल नाही, अशा शिव्या देते”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले आहेत.

“खोट्याला किंमत नाही. लेखकाने जे सत्य आहे ते नीट तपासून पाहावं. त्याचेही दोन प्रकार असतात. दिसणारं सत्य आणि न दिसणारं सत्य. लेखकाला न दिसणारं सत्य सापडलं पाहिजे. हे खोटं बोलत आहेत, राम मांसाहारी होता की शाकाहारी होता? आता हे वाचूनच लक्षात येतं ना, कशाकरता त्याची चर्चा करायची? त्यामुळे जे खरं आहे ते प्रत्यक्ष खोदून पाहा, मग कळेल खरं काय आहे ते. नुसतंच टीव्ही, भाषणं, चर्चा वगैरे भानगडीतून सत्य सापडणार नाही. प्रत्यक्ष जावून शोधणं महत्तावचं आहे की, हे खरोखरंच आहे का? त्यात पुन्हा एकच रामायण आहे का? आमचे मित्र रामानुंज यांनी टू हन्डरेड रामायण हे पुस्तक लिहिलं आहे. ते बंद पाडलं. कशामुळे?”, असा सवाल भालचंद्र नेमाडे यांनी केला.