पाचोरा : येथील तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांची अचानक बदली झाली असून भडगाव तहसीलदार विजय बनसोडे यांची पाचोरा तहसीलदारपदी नियुक्ती केल्याचा आदेश महसूल विभागाने जारी केला आहे. प्रवीण चव्हाणके यांची गेल्यावर्षीच पाचोरा तहसीलदार म्हणून नेमणूक झाली होती. मात्र, वर्षभराच्या आतच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जप्त केलेल्या जमिनीच्या हस्तांतरणसंदर्भात पाचोरा तहसील प्रवीण चव्हाणके यांनी आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात कायदेशीर मुद्याचा आधार घेऊन कारवाई केली. आमदार किशोर पाटील यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके विरोधात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहातच पाचोरा तहसीलदारांना निलंबित केल्याचे घोषित केले होते.
मात्र, तसे निलंबन न होता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर प्रवीण चव्हाणके ड्युटीवर हजर झाले. त्यानंतर जळगांव येथील मीटिंगमध्ये माजी आमदार दिलीप वाघ यांनी पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या निलंबन संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता आमदार किशोर पाटील यांनी तहसीलदार यांना निलंबित न करता बदली करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री विखे-पाटील साहेबांनी शब्द दिला असल्याचा खुलासा केला होता. अखेर पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना वर्षभरातच मुदतपूर्व बदलीस सामोरे जावे लागले आहे.