नंदुरबार : तापी योजनेच्या माध्यामातून नंदुरबारासह तालुक्याला येत्या पात वर्षात पाणी मिळणार, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथे आयोजित कामगारांसाठी साहित्य वितरण व विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, सरपंच प्रविण पाटील, उपसरपंच डॉ. मनोज राजपूत, मोतीलाल पाटील, दिलीप पाटील, सोपान भलकार, डॉ. रणजित राजपूत यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
तालुक्यातील आसाणे आणि निंबेळ या ठिकाणी धरणांच्या उभारणीसाठीची निविदा येत्या १५ दिवसात प्रसिद्ध होणार आहे. तापी नदीचे पाणी या धरणांमधून नंदुरबारसह तालुक्याला शेती आणि पेयजलाची गरज भागविणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात पेव्हर ब्लॉकसह, रस्ते, गटारी यासारखी विकासकामे देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही मागणीप्रमाणे ही कामे करण्यात येतील.
कामगारांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर असून त्यांच्या दैनंदिन उपयोगच्या साहित्यासह त्यांना सामाजिक, वैदयकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमतेसाठी जे-जे शासन म्हणून कराता येईल ते केले जात आहे. येणाऱ्य काळात जिल्ह्यातील एकही कामगार शासनाच्या सुविधांपासून वंचित राहणार नाही, यांचे नियोजन करण्याचा प्रयत्न असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात खर्दे, सैताने, ढंढाणे, रनाळे वैंदाणे, बलवंड येथील ६०० कामगारांना दैनंदिन उपयोगाच्या संचांचे वितरण मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले.