धडगाव : अतिदुर्गम भागातील तिनसमाळ येथील ढुठ्ठलपाडा आणि घुडानचा पाड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. पाणी आणायच्या कामात महिला, चिमुकले, वृद्धांचीही मदत घेतली जात असून पाण्यासाठी चक्क दोन ते तीन किलोमीटर खोल घाटात उतरावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तिनसमाळ येथे जानेवारीच्या पहिल्याच महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे दरी, घाट गाठावे लागत असून आणखी मे आणि जून महिन्यात कशी परिस्थिती येईल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहे. दररोज सकाळी महिला, लहान मुलं, वृद्धांना घाटात उतरून पाणी भरून आणावे लागत आहे. दोन ते तीन नैसर्गिक स्रोतावर फेरफटका मारावा लागतो, तेव्हाच पुरेसे पाणी मिळते, अथवा पाण्याविना दिवस काढावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शिवाय, जंगल आणि घाटाचा भाग असल्याने येथे हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. मागील काही वर्षात दोन मुले व एक वृद्ध पाणी भरण्यासाठी गेले असता बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आणखी कुणाचा जीव जाईल, याची वाट न पाहता, किमान पिण्याचा पाण्याची सोय करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मनरेगातून विहिरीची मागणी
मागील एक वर्षांपासून मनरेगा योजनेतून वैयक्तिक सिंचन विहिरीची मागणी केली आहे. मात्र, मंजुरी मिळत नसल्यामुळे योजनेपासून वंचित आहे. गाव पाड्यात एकही शासनाची विहीर किंवा इतर सुविधा नाही. प्रत्येक पाड्यातील रहिवासी घाट, दरीतूनच पाणी वापरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागातून किंवा मनरेगातून उपाययोजना केल्यास पाणी मिळण्यास शक्य परंतु योजना राबविणार कोण ?
– लक्ष्मण मोगरा पावरा, तिनसमाळजल जीवन मिशन अंतर्गत कामे मंजूर आहे परंतु, रस्त्याअभावाने कामे कशी होणार, यासाठी आधी रस्ता दुरुस्ती झाल्यास विकासकामे जलदगतीने होईल.
-तानाजी पावरा, तिनसमाळदिवस भर नैसर्गिक स्थळी पाणी राखून बसावे लागते, तर इतर कामे करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती भार पडतो.
– सकीबाई पावरा, तिनसमाळआधी गाढवावर डबे बांधून दुरून पाणी भरत होतो मात्र आता गाढव नसल्यामुळे डोक्यावरच पाणी भरावे लागते. शासनाने किमान गाढव तरी वाटप करावे. जेणेकरून गाढवावर पाणी भरण्यास सोय होईल.
– गोण्या पावरा, तिनसमाळ