Maharashtra Politics : शिवसेनेनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी बंड केला आहे. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत देखील दोन गट निर्माण झाले असून, रोजच एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना टोला लगावला आहे.
राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळांच्या पदांची संख्या, यादी प्रसिद्ध करीत आमदार रोहित पवार यांनी साहेबांनी (शरद पवार यांनी) आणखी काय द्यायला हवे? असे टि्वट केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात असताना सोमवारी (दि. 10) दुपारी राजगुरुनगर येथे थांबून छगन भुजबळ यांनी हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना प्रतिसाद देताना ते बोलत होते.
काय म्हणाले भुजबळ?
रोहित पवार आईच्या पोटात चार महिन्यांचे असताना मी आमदार होतो, मंत्री होतो. ते सहा महिन्यांचे असतील तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. 15 वर्षांचे असतील तेव्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पदावर होतो. त्यांना राजकारणाची जाण किती? हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. मागे बड्यांचे आशीर्वाद आहेत, माझे तसे नाही, असे त्यांनी सुनावले.
मशिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमच्या शपथविधीला पहिल्या रांगेत बसले, का परतले? महिती नाही. त्यांना शिरूरच्या पाच आमदारांनी निवडून पाठवले. पुढे काय होईल, हे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हेच सांगू शकतील,फ असा टोला त्यांनी कोल्हे यांना लगावला. जुन्नरचे आमदार अतुल बेनके काही म्हणत असले, तरी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुढच्या निवडणुकीत ते असतील, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.