मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्या रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भाजपा आणि आमची वैचारीक लढाई आहे. या लढाईत प्रफुल पटेल भाजपाच्या बाजूने आहेत त्यामुळे आम्ही त्यांना अपात्र करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अजित पवार हे जेव्हा जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री झाले तेव्हा खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्याची मागणी आम्ही केली. मात्र श्रीनिवास पाटील यांनी अपात्र होण्यासारखं काहीही केलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
यावर ट्विट करताना रुपाली चाकणकर यांनीही एक कविता पोस्ट करुन सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, “तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?”
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?
चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?
तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?
पाया भरला, विटा-वासे तोलून धरले
घराचा उंबराच विचारे
तू कुठं काय केलंस?
नांगर धरला, शेती केली
भुईला भीमेचं भान दिलं
मुसक्यांची गाठ विचारे
तू कुठं काय केलंस?
घामाला दाम दिला
कष्टाला मान दिला
रक्ताचं पाणीच विचारे
तू कुठं काय केलंस?
अशी कविता पोस्ट करत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.