सणासुदीचा कालावधी असूनही मुबलक आयातीमुळे खाद्यतेलांचे दर मंदीतच असून, गेल्या आठवड्यातही शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांचे दर 15 किलो/लिटरच्या डब्यामागे आणखी 40 ते 50 रुपयांनी कमी झाले. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखण्याकरिता केंद्र सरकार आवश्यक ती पावले उचलत असून, याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात बॉईल्ड तांदळाच्या निर्यातीवरही 20 टक्के शुल्क लागू करण्यात आले आहे. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सरकार विचार करीत असल्याचे वृत्त आहे.
मुबलक पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, पामोलिन तसेच सूर्यफूल तेलाचे दर मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. सणासुदीच्या काळातील वाढती मागणी लक्षात घेऊन भारतातील आयातदारांनी नेहमीपेक्षा सुमारे तीस टक्के अधिक प्रमाणात आयात केली आहे. यामुळे बाजारात खाद्यतेलांची मुबलकता असून, उठाव मात्र एकदम कमी आहे. परिणामी, सर्वच खाद्यतेलांचे दर मंदीकडे झुकले आहेत. गेल्या आठवड्यातही मागणीअभावी खाद्यतेलांचे दर 15 किलो/लिटरच्या डब्यामागे आणखी 40 ते 50 रुपयांनी कमी झाले. वनस्पती तुपाच्या दरातही 30 ते 40 रुपयांनी घट झाली. पावसाने उघडीप दिल्यामुळे भूईमूग शेंगांची आवक लवकर होईल, या अपेक्षेने आणि मागणी कमी असल्यामुळे शेंगदाणा तेलाच्या दरातही 50 रुपयांनी घट झाली.
मागणी वाढल्यामुळे मिलबर गव्हाच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली. आवक कमी असल्यामुळे तांदळातील तेजी कायम आहे. मागणी साधारण असल्यामुळे गहू आणि ज्वारीचे दर स्थिर होते. आवक साधारण असली तरी उठाव कमी असल्यामुळे साबूदाणा, शेंगदाणा, भगर, मिरची, गोटा खोबरे या जिनसांचे दर स्थिर होते. पोह्यांमधील तेजी कायम असल्याचे सांगण्यात आले.