पाचोरा : शहरातील सेवानिवृत्त वृद्ध कामानिमित्त घरून शहरात जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना रस्त्यावर थांबवून पोलीस असल्याचे भासविले. सुरक्षेचे कारण सांगत त्यांच्या हाताच्या बोटातील अंगठ्या काढायचे सांगून काही कळण्याच्या आत पसार झाले. विशेष, ही घटना भरदुपारी घडल्याने शहरात एकटे- दुकटे वृध्द गाठून त्यांना लुबाडणारे चोरटे शहरात जर सक्रिय झाले असतील तर पाचोरा पोलिसांना हे आव्हान ठरणार आहे. लुबाडणूक झालेल्या वृद्धाने पोलिसात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सानेगुरुजी कॉलनीत वास्तव्यास असलेले ७९ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक भिवराव भाऊराव पाटील हे ३० जानेवारी रोजी दुपारी दीड च्या सुमारास खाजगी कामासाठी एम. एम. महाविद्यालयाच्या पाठीमागील दत्त काॅलनी परिसरातुन जात असतांना त्यांना विनानंबर मोटरसायकल वर असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी भिवराव पाटील यांना थांबवुन आम्ही पोलिस आहोत. तुमच्या परिसरात फसवणुकीच्या व चोरीच्या घटना घडत आहेत.
आम्हाला साहेबांनी पेट्रोलिंगसाठी पाठविले आहे. असे सांगून त्यांचे जवळील लाल रंगाचा हात रुमाल काढत भिवराव पाटील यांच्या हाताच्या बोटात असलेल्या ३० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ९ हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी अशा दोन अंगठ्या रुमालात ठेवण्याचा बनाव करत रुमाल भिवराव पाटील यांच्या कडे दिला. व घटना स्थळावरुन पसार झाले. काही वेळानंतर भिवराव पाटील यांनी रुमाल बघितला असता दोन सोन्याच्या अंगठ्या आढळुन आल्या नाही.
तेव्हा भिवराव पाटील यांना लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. या प्रकरणी भिवराव पाटील यांनी पोलिस स्टेशन ला येऊन झालेली घटना कथन केली. पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय. सुनिल पाटील तपास करीत आहे.